भाजीवाला - आणि कोरोनो चा काळ .
गेल्या तीन महिन्यापासून आमच्या कडे एक भाजीवाला येतो व रोज दरवाजा वाजवून काकडी घ्या , वांगी घ्या , टोमॅटो घ्या .असे ओरडून निघून जातो .
त्याच्याकडे कधी कधी एकच प्रकारची भाजी असते तर कधी कधी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या .I
फ्लॅट सिस्टम असल्यामुळे दरवाजा वाजवला की तो उघडायचा कंटाळा येतो म्हणून गेले तीन महिने मी दरवाजाच उघडला नाही .
फ्लॅट सिस्टम असल्यामुळे दरवाजा वाजवला की तो उघडायचा कंटाळा येतो म्हणून गेले तीन महिने मी दरवाजाच उघडला नाही .
आणि तो भाजी विकणारा ही बऱ्याचदा चुकीच्या वेळेला यायचा , काहीतरी कामात असलो की हा दरवाजा वाजवायचा . त्यामुळे त्याचा राग ही यायचा .
अनेकदा म्हणजे रोजच त्याला मी नाही म्हणून सांगायचो .पण हा परत दुसऱ्या दिवशी हजर .
असे करता - करता तीन महिने लोटले .
तो यायचा दरवाजा वाजवायचा , वांगी देऊ का ? टोमॅटो देऊ का ? काकडी देऊ का ?
याला माझे उत्तर हे नाहीच असायचे .
पण कोरोनो च्या काळात गेला महिनाभर मी घरातच बसून आहे , आणि त्यामुळे कुठे बाहेर ही फिरता येत नाहीये . सायकल उभी आहे . ट्रेक बंद आहेत , आणि पुस्तकं विकत घ्यावीत म्हणले तर ऑनलाईन पोर्टल ही बंद आहेत .
सर्व बाजूनी नाकाबंदी झालीये .
मग अशात कधीतरी नैराश्य येते , घराच्या खिडकीत बसून शून्यात नजर हरवून बसावे वाटते .
या काळात काहीतरी करता येईल हे खरे पण किती करावे . थोडं तरी बाहेर फिरता आले पाहिजे . आणि ते भाजी विकत आणण्यापुरते तर नकोच .
तर असाच खिडकीत बसलो होतो .
दरवाजा वाजला , वांगी देऊ का ? म्हणून त्याचा आवाज आला .
आता मला राग आला होता , पण तो लगेच आवरून , हा आहे तरी कोण म्हणून दरवाजा उघडून तरी पहावे म्हणलं,
दरवाजा उघडला , किचकट माणूस उभा होता . डोक्यावर किमान दहा किलो वांगी असावीत . टोपलीचे व तराजू चे वजन वेगळेच .
बाहेर ऊन चांगलेच तापते आहे . तो ही घामाघून झालेला .
मी त्याच्याकडून वांगी घेतली .
दरवाजा लावला .
आणि त्याचा विचार करू लागलो , किती हा चिवट असावा . गेले तीन महिने मी याला नाही म्हणतोय आणि तरी हा रोज दरवाजा वाजवतो . या आशेने की एक दिवस तरी या घरातून कुणीतरी दरवाजा उघडेल . आणि माझ्याकडची दहा रुपयांची वस्तू तरी विकत घेईल .
बरं हा मला किचकट दिसला , पण तसा तो नाहीये . त्यांच्या अंगावर नखभर सुद्धा मांस नाहीये .
चरबी हा विषयच नाही . डोक्यावर इतके ओझे घेऊन हा आमच्या बिल्डिंग मध्ये तीनशे पन्नास पायऱ्या तरी खाली - वर चढत उतरत असेल .
आणि गावात फिरणे ते तर वेगळंच .
तो आता निघून गेलेला असतो , मी ही आपलं फेसबुक उघडून बसतो . कुणीतरी सेलेब्रिटी योगा करताना दाखवला आहे . दुसऱ्या पेज वर गेलो तर तिथे ही एक डायटीशियन या काळात व्यायाम कसा करावा . आणि हा दिवसात आपला डायट प्लॅन कसा असावा . याबद्दल मार्गदर्शन करत होती .
वजन वाढू नये म्हणून ओरडू - ओरडू सांगत होती . घाम गाळायला सांगत होती . ते ही घरातल्या फॅन खाली . डायट प्लॅन विषयी तर भर-भरून सांगत होती .
मग फेसबुक स्क्रोल केलं , आणि एक बाबा सांगू लागला या काळात तुम्ही कसे मानसिक आजारापासून दूर राहिले पाहिजे .
या काळात नैराश्य येण्याची शक्यता अधिक असते.
आणि मग मला पुन्हा तो भाजी विकणारा आठवला , ज्याला मी तीन महिने नाही म्हणत होतो , त्याने दरवाजा वाजून ही मी दरवाजा उघडत नव्हतो तरी त्याला कधी नैराश्यने घेरले नाही .
त्याला व्यायाम ही करावा लागणार नव्हता , जो माणूस रोज तीनशे पन्नास पायऱ्या चढत - उतरत असेल त्याला काय गरज योगा किंवा व्यायाम करण्याची .
आणि अंगावर चरबीच नाही तर डायट प्लॅन ची गरज ती काय ?
मी फेसबुक बंद केले , पुन्हा खिडकी जवळ येऊन बसलो , नैराश्यचं मळभ दूर पळून गेले होते .
आणि मग मनात विचार चमकून गेला , ज्या गोष्टींची कधी गरजच नव्हती त्याच गोष्टी माणूस जवळ बाळगत बसला . आणि मग योगा आला , व्यायाम आला , आणि डायट प्लॅन ही आला .


True!
ReplyDelete